श्रीराम जन्मोत्सव २०२४

श्रीराम जन्मोत्सव - २०२४

जन्मभूमीच्या भव्य महाली 
नीरव शांतता भंग जाहली
देवी कौसल्या प्रसूत झाली 
आज अयोध्या सजली नटली....१

भर माध्यान्ही चैत्र नवमीला
कौसल्येचा पुत्र म्हणोनी
जन्म घेतला पृथ्वीतलावर
श्रीविष्णूंचा अवतार म्हणोनी.....२

जन्म सोहळा तुझा अनोखा
आम्ही केवळ श्रवण करावा
करी कौतुक प्रजाजन बघुनी
डोळे मिटून घे तव जननी.....३

तुझा पाळणा नित्य सजवूनी 
झुलवी माता तिन्ही रंगुनी
क्षण दशरथा अति भाग्याचा
मान लाभला देव पित्याचा.....४

जन्मताच तू प्रेम लुटावे
त्यात नित्य आकंठ बुडावे
डावा उजवा तुझ्यात नसतो
अंजनीसुत तुज हृदयी वसतो.....५

आजानुबाहू तुझे सावळे
रूप पाहता दिव्य कोवळे
कमलनयन अतिसुंदर डोळे
अवघे त्रिभुवन तुजवर भाळे.....६

सत्यवचनी केवळ रघुकुल
सूर्यवंशी तू दशरथ नंदन
भ्राता त्रय तुज प्रेमे बघती
करती तुजला त्रिवार वंदन.....७

गुरू आज्ञेने राक्षस वधीले
यज्ञयाग ते निर्विघ्न जाहले
मुक्त करुनी शिळा अहिल्या
मुनी जन करती वंदन तुजला.....८

स्वयंवरा त्या जनकपुरीला
शूर पुरुष ते सिद्ध सभेला
उचलून घेई शिवधनुष्याला
दिसे न कोणी त्या जनकाला.....९

अनुज्ञा मागुनी श्री जनकाला
चरणस्पर्श मग करुन गुरूला 
सहज मोडीले त्या धनुष्याला
हर्षुनी देखे सलज्ज मिथिला.....१०

मैथिली झाली श्रीरामाची
राज्ञी आमुच्या अवधपुरीची
स्वर्गावरूनी पृथ्वीतलावर
पुष्पवृष्टीने भरले अंबर.....११

एकवचनी तू प्रभू श्रीरामा
प्रजानुरंजक प्रभू श्रीरामा
पुरुषोत्तम तू प्रभू श्रीरामा
स्पंदन अमुचे प्रभू श्रीरामा.....१२

आज तुझ्या या जन्मतिथीला
जमले सगळे अवधपुरीला
भाग्योदय हा सनातनाला 
भाव धन्यता हिंदू मनाला.....१३

नशीब आमुचे थोर असावे
सुकृत पूर्वजन्मिचे असावे
लोभस दर्शन नित्य दिसावे 
भान हरपूनी बघत रहावे.....१४

तुझ्या मंदिरी तुला बघूनी
बालक रामा तुला पूजूनी
शब्द थिटे हे होती का बरं 
वचनपूर्तीचा क्षण हा सुंदर.....१५

|| श्रीराम जयराम जय जय राम ||
**************************
१७.०४.२०२४

Comments

Popular posts from this blog

आभाळ माया

इस्रो स्तवन