आभाळ माया
क्षितिजाच्या पलिकडले, आभाळ ठेंगणे दिसले
हात लागू दे आभाळाला, सहज असे वाटले....
उंची वाढता प्रभाव पडतो, असे वाटते कुणा
परंतु भूमीकडे पाहता, मिटती पाऊलखुणा....
पावलांची चाहूल येता, कुणी येतसे अपुल्या वाटे
येणाऱ्याचे स्वागत होते, स्वभाव सांगे खरे की खोटे...
स्वभावाला औषध नाही, असे कुणी का बरे म्हणाले
व्याधींवरल्या यादीमध्ये, स्वभावालाही जोड म्हणाले....
गुणदोषांसह माणूस जोडा, दोष दुर्लक्ष करा सांगती
फक्त गुणांवर लक्ष असू द्या, बघता बघता नाती जुळती...
नाती जपावी आणि टिकावी, मग दोषांचे क्षरण व्हावे
नाती गुंफत जाता जाता, देश समाजहित रक्षण व्हावे....
या पृथ्वीवर नसे कुणीही, पूर्णपुरूष तो आजमितीला
अपूर्णाकडून पूर्णत्वाच्या, वाटे चालू रोजमितीला....
चालताना आभाळ दिसू दे, क्षितिजाच्या त्या चरणापाशी
नको संपवू प्रवास अपुला, पोचेस्तव तू क्षितिजापाशी....
पोचताच तू क्षितिजापाशी, पाय रोवूनी घट्ट उभा हो
मग दिसता आभाळ ठेंगणे, हात लावुनी बघ त्याला हो....
********************************************
शैलेश चौथाईवाले
०३.१०.२०२४
आश्विन शुद्ध प्रतिपदा
Comments
Post a Comment