इस्रो स्तवन



मोहीम आखून नेमकी ठरवली इस्रोनी त्याची खरी
भिडले त्वरी सगळे कठिण जी होती महा ती खरी
कार्याला वाहून पूर्ण दिवस जे स्वप्नास ज्या पाहती
वैज्ञानिक लागले अनवरत त्या पूर्णत्व देण्या किती....१

मेधा तल्लख शुद्ध-बुद्धी वसते अंगी जयांच्या कशी
अभ्यासोनी नित्य तीच झळके डोळा तयांच्या तशी
रात्रीचा दिन तो करून म्हणती माघार नाही मुळी
घेण्या झेप नभी सुसज्ज करती यानास सिद्ध वेळी...२

मोहीम मागची कशी अपयशी झाली असे त्या दिनी
त्यावर उत्तर शोधणे सतत ही शास्त्रज्ञ दैनंदिनी
सत्वर ठोस पावले उचलुनी येती निष्कर्षाप्रती
उणीवा दूर करून सगळ्या देती जगा खात्री ती ...३

आता मात्र भरारी घेत करूया यानास प्रक्षेपित
आश्वासन देत नित्य म्हणती येतो वसुंधरेचे सुत
देशाचा ध्वज हा तिरंगी तुजला देईल तो विक्रम
इस्रोतील भगिनी बंधू करती अद्भुत हा पराक्रम...४

दिन ते चाळीस पूर्ण करून घडली ही प्रदक्षिणा
यानाचे सहजी तिथे उतरणे संकल्प हा त्या क्षणा
संचालन गतीचे मिळून करती इस्रोमधूनी श्रमी
रोवूनी पद अंगदासमान तिथल्या भूमीवरी विक्रमी...५

देशाचा अभिमान बावनकशी शास्त्रज्ञ ते दर्शती
कार्याला करण्या यशस्वी हवी जी एकाग्रता दर्शती
वृत्तीचे दिसते समर्पण तिथे प्रत्येक चेहऱ्यावरी
गुण हे आपण बाणवून सगळे संकल्प व्हावा घरी...६

यानाचे पदचिन्ह जे उमटले दक्षिण ध्रुवावरी
उडली धूळ कितीक म्हणता विक्रम नं सांगे तरी
मामाने असतील नक्की पुसले आडूनी चक्षू  द्वय
इकडे देखील कोटी जन हे पुसतात चक्षू द्वय...७

आता पुढचा प्रवास ठरतो मंगळ नी शुक्रावरी
सूर्यालाच दिली गवसणी शक्ती ही हनुमंतापरी
अवघी सृष्टी तयार करण्या मां भारतीची स्तुती
कालिंदीसुत शुभ चिंतन करी गाऊन इस्रो स्तुती...८

शैलेश चौथाईवाले

Comments

Popular posts from this blog

आभाळ माया